Tuesday, April 25, 2017

कर्तव्य आणि अधिकार

रात्रीच्या जेवणाची वेळ होती. कॅन्टीन मध्ये फक्त स्टाफचे नेहमीचे मेंबर असल्याने कॅन्टीनची खाणावळ  झाली होती. जेवणा बरोबर गप्पा हि रंगल्या होत्या. आज झुणका, भाकर, भरीत असा अस्सल मराठी बेत होता आणि भुर्के मारत जेवण चालले होते. तिकीट चेकर गोखले, बुकिंग क्लार्क इनामदार, पार्सल क्लार्क लोखंडे, तिकीट कलेक्टर गुप्ते आणि अजून काही मंडळी नेहमी रात्रीच्या जेवणाला कॅन्टीनला असत. आजचा गप्पांचा विषय होता भ्रष्टाचार.
   तो ऑगस्ट 2011 चा शेवटचा आठवडा होता. भारताचा कोना कोपरा अण्णा हजारेंच्या आंदोलनात पेटलेला होता. जो तो "लोकशाहीचे खरे अर्थ", "सरकार आणि त्याचे कर्मचारी कसे जनतेचे नोकर असतात", "नियमाचं पालन स्वतः तर करावच, आणि इतरांना करायला भाग पाडण्यास घाबरू नये" असल्या गोष्टी करत होता. मी देखील कॅन्टीन मधून थोडा वेळ काढून अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी केलेल्या मोर्च्यात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलला होता.

 "भ्रष्टाचाराचं तर असं आहे कि if there is no one to give bribe there will be no one to take it. जो पर्यंत लोकं लाच देत आहे लोकं घेणं कसं बंद करतील."  गोखल्यांनी पहिला मुद्दा मांडला.

"गोखले साहेब तुम्ही जे इंग्रजी सुभाषित म्हणाला ते इंग्रजांनी काढलेली पळवाट आहे. अहो इंग्रजांच्या राज्यात सगळे पदासीन अधिकारी इंग्रज किंवा त्यांचे आश्रित असत. त्यांची सुटका करायला आणि भारतीयांना बरोबरीने जवाबदार ठरवायला त्यांनी हे खूळ काढले. स्वतंत्रताप्राप्ती नंतर हि ते तसंच सुरु राहिले. एकाकडे तुम्ही कर्तव्य दिलं आणि अधिकार हि दिले आणि त्या कार्याबद्दल तुम्ही त्यास पगार हि देत आहात. आता तो मनुष्य जर लाच खातो हा नक्कीच लाच देण्यापेक्षा मोठा गुन्हा ठरला पाहिजे. लाच देणाऱ्याकडे काहीहि  अधिकार नसतात. काही देशांनी लाच देणं हे गुन्हांच्या यादीतून काढून टाकलं, तिथे लाच लुचपत एकदम कमी झाली. भारतात लाच घेणारा घाबरत नाही कारण लाच देणारा हि गुन्हेगार असल्याने तो पण गप्प बसेल ह्याची त्याला खात्री असते" गुप्त्यांनी एकदम सणसणीत उत्तर दिलं. 
"गुप्ते तुमचे म्हणणे तसे चूक नाही. पण एक गोष्ट सांगू का.  भारतात काय पण कुठल्या हि देशाच्या जनतेचं आणि नियमांचं पटत नाही. काही देश वगळले तर सगळीकडे नियम हे मार्ग सोपा करण्याऐवजी कटकटीच निर्माण करणारे असतात आणि त्या मुळे लोकांना पळवाट ही हवी असते. भारतात तर लोक आपले अधिकार गाजवत नाही आणि कर्तव्य हि पाळत नाही. सरकारी कामाशी आपला जितका कमी संबंध येईल आणि जितक्या लवकर तिथून आपली सुटका होईल ते बघतात. इंग्रज गेले पण अजुन सरकार आणि जनता एक दुसऱ्याला आपलं समजतं  नाही." गोखल्यांनी सांगितलं. 

"अगदी बरोबर, परवाचीच गोष्ट घ्या. ३२८९  अपची साखळी प्लॅटफॉर्म सोडल्या सोडल्या ओढली  गेली. सेकंड AC  च्या डब्यात एका देशपांडे बाईंनी ओढली होती. बाई मुंबईच्या कुठल्या कॉलेजच्या प्रोफेसर होत्या. त्यांना साखळी ओढायाचं कारण विचारलं तर उलट आमच्यावरचं चिडून म्हणाल्या कि माझ्या कंपार्टमेंट मध्ये लाईट आणि AC  दोन्ही बंद आहे म्हणून मी साखळी ओढली. आम्ही त्यांना आधी थोडं समजवायचा आणि नंतर थोडी नियमाची भीती दाखवायचा प्रयत्न केला. AC  सुरु नसणे हे चेन ओढायला समर्पक कारण नाही आणि तुम्हाला भुर्दंड भरायला लागेल असं म्हणून बघितले. पण बाई काही ऐकत नव्हत्या. उलट त्याच आम्हाला म्हणाल्या कि मी आनंदाने भुर्दंड भरते पण तुम्ही मला लिहून द्या कि गाडीचा लाईट आणि AC सुरु नाही मग मी बघते दंड कोणाला होतो आणि भुर्दंड  कोणाला. आम्हाला आधी वाटलं कि यांचं काही पोलिटिकल कनेक्शन असेल, पण तसं  काही नव्हतं. त्या तत्वाला अडून बसल्या होत्या. आम्ही त्यांना आश्वासन दिले कि पुढल्या स्टेशनवर दुरुस्त होईल सध्या गाडी जाऊ द्या. त्यावर त्यांने आम्हाला सांगितले कि तुम्ही माझ्या बरोबर पुढच्या स्टेशनपर्यंत चलत असला तरच तुमच्या वर विश्वास ठेवते. थोड्या वेळाने त्यांच्या सहप्रवास्यांनाही कंटाळा आला आणि त्यांने सुद्धा बाईची समजूत घालायला सुरुवात केली. सगळेच आपल्या विरुद्ध बघून बाई वरमल्या आणि "लोकांना आपल्या हक्कांची जाणीव नाही तर मला काय" असा म्हणत  आपला हट्ट सोडला."  गुप्ते म्हणाले. 
"अण्णा हजारे पुष्कळ जनता जागृती करतात आहे. पण त्या बाई आपल्या कामात अगदी प्रामाणिक असतील का ? काही लोक आपला हक्क सोडत नाही पण आपली जवाबदारी मनावरचं घेत नाही." मी संभाषणात उतरलो.
"तुम्हाला शनिवारी स्टेशनच्या बाहेर ट्रैफिक जाम झाला होता त्याची हकीकत माहित आहे"    बुकिंग क्लार्क  इनामदार नेहमी प्रमाणे कथा सांगायच्या आधीची प्रस्तावना मांडत म्हणाले.

"माहीत असो की नसो आता इनामदार कही गोष्ट सांगितल्या शिवाय राहणार नाहीत"  गोखले.

इनामदार साहेबांना कथा छान रंगवून सांगत असत. त्यांने सांगायला सुरु केलं .

"तर मग ऐका . शनिवार रात्री मी माझ्या मित्रांबरोबर स्टेशनच्या बाहेरच्या आदर्श रेस्टारंट अँड बार मध्ये जेवायला घेतो होतो. आपण तसलं काही घेत बीत नाही, पण मित्र घेतात आणि मग गप्पा चांगल्या रंगतात. रात्री साडे नवाच्या सुमारास बाहेर आलो तर पूर्ण ट्रॅफिक खोळंबलेला. दोन्ही कडून हॉर्न बोंबलत होते. थोडा पुढे जाऊन बघितले तर एक काका कार मधून ओरडत होते "मैं अपनी गाड़ी साइड से नहीं निकलेगा". ते अर्थातच त्या घोळक्यचे केन्द्रबिंदू होते. रोड वनवे होता अणि काका बरोबर दिशेने येत होते पण रात्रीची वेळ बघून चुकीच्या दिशेने पुष्कळ वाहनं आली होती आणि काकांची गाडी त्यामुळे सरळ पुढे जाऊ शकत नव्हती. समोरून येणाऱ्यांनी आपली वाहने थोडी बाजुला करून काकांना जरा वळून पुढे जायची वाट करून दिली पण काका तत्वाला अडून बसले होते कि मी बरोबर आलो आहे तुम्ही सगळे चुकीच्या दिशेने शिरला आहात, मी माझी वाट वाकडी करून जाणार नाही तुम्ही सगळे मागे जा मगच मी माझ्या रस्त्यावरून सरळ जाईन. समोरून आलेली सगळी माणसं काकांकडे असहाय होऊन बघत होती. काकांने या खेळाची पहिली फेरी जिंकली होती. 

 काकांच्या या करारी बाण्यामध्ये अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा प्रभाव स्पष्ट दिसत होता. "आम आदमी" आपली ताकद दाखवत होता आणि  स्वतः बरोबर असला तर गर्दीच्या समोर उभा राहायला घाबरत नव्हता. 

 लवकरच खोळंबलेल्या लोकांचा धीर सुटायला लागला. १-२ रिक्षावाले काकांच्या वर धावून आले. आम्ही मित्र जे मजा पाहत उभे होतो आम्हाला वाटलं कि आता मारामारी झाली तर आम्हाला काकांना वाचवायला हवें. ज्या मित्रांने जेवणा बरोबर इतर स्फूर्तिदायक पेय घेतले होते त्यांचा उत्साह दांडगा होता. पण त्यांचा तोंडाला सुवास येत असल्याने त्यांनी रस्त्यावरच्या भांडणात मध्यस्थाची भूमिका घेणे  त्यांनाच धोक्याचं झाले असते. आम्ही काकांपेक्षा पुष्कळ  लांब होतो आणि रिक्षावाले त्यांच्या जवळ आले होते म्हणून आम्हाला काहीच करता आले नाही, पण त्याची गरजही लागली नाही. रिक्षावाले येतांना बघून काका स्वतः गाडीतून बाहेर आले आणि म्हणाले "गलत साईड से आप लोग घुसा है और आपको मेरे को मारने का है? तो मारो!! मै यहीं खड़ा है, लेकिन साइड से गाड़ी नहीं निकालेगा". काकांचे हे वाक्य ऐकुन रिक्षावाले थंड पडले. मारामारी कशी करायची हे त्यांना माहित होतं पण कुणी विनम्रतेने मार खायची तयारी दाखवली तर काय करायचं हे त्यांना out of course होतं. 
काकांनी दुसरी फेरी पण जिंकली होती.

आता मात्र काकांनी हे प्रकरण आणखी ताणायला नको असं सगळ्यांना वाटायला लागले होते. त्यांच्या मागेही बरीच वाहनं थांबली होती आणि ती तर बरोबर दिशेने शिरली होती मग त्यांना त्रास कशासाठी?  काकांनी आपला निषेध पूर्ण नोंदवला होता. आता हा वाद नियमासाठी नसून अहंकारासाठी होतं आहे असे वाटायला लागले. दोन्ही बाजुंनी दिवसभराचे थकलेले, वैतागलेले, काहींची गाडीची वेळ झालेली, काही गाडीतून उतरून घरी जायला निघालेले सगळे लोकं काकांकडे आशेने बघत होते. पण काका हट्टाला पेटले होते आणि स्वत:च्या गाडीच्या समोर उभे राहून लोकांना मागे जायला सांगत होते आणि आम्ही पान खायला निघालो होतो हे विसरून पुढे काय होतं हे बघायला तिथेच थांबलो.

  तेवढ्यात मागून एक गुंड कॅब ड्राइव्हर येतांना दिसला. त्याने कोणाला बोलायची संधी दिली नाही आणि सरळ काकांवर धावला. आम्हालाही पुढचा अंदाज आला आणि आम्ही काकांना वाचवायला पुढे झालो. पण आम्हाला तिथे पोहोचायला थोडा उशीर झाला. सुदैवाने हातघाईत काकांना मार बसला नाही पण ते रस्त्यावर घसरून पडले.  त्या गुंडाला देखील काकांना फक्त दम द्यायचा होता मारायचे नव्हते. आम्ही काकांना उचलले आणि त्यांचे कपडे झटकले. काकांच्या बाजुने एवढी माणसे बघून तो गुंडं मागे झाला आणि ओरडला "खाली पीली सबका टाइम खोटी काय को करता है तेरे को जगह दी है वहां से वट ले
  गुंडाचा हा अवतार बघुन काका वरमले. पुढे मागे न बघता ते आपल्या गाडीत बसले आणि थोडं वळण घेऊन आपल्या वाटेला गेले. लगेच सगळी वाहनं सुरु झाली आणि आम्ही पानाच्या दुकानाकडे निघालो.  पान खाऊन परत त्या रस्त्यावर आलो तेंव्हा गर्दी ओसरली होती. तेवढ्यात आम्हाला ते काका परत येतांना दिसले. "पिक्चर अभी बाक़ी है मेरे दोस्त" चंद्रलोकात फिरत असलेला मित्र पुटपुटला. काका पायीच येत होते. विचारल्यावर कळले की काकांचे क्रेडिट कार्ड हरवले आहे आणि जेथे ते घसरून पडले होते तेथे कार्ड पडले असेल असा त्यांना संशय आहे. रात्री १० वाजता आम्ही रस्त्यावर काकांचे कार्ड शोधत होतो. संध्याकाळी पाऊस पडल्या असल्याने रस्त्यावर डबकी झाली होती. काकांनी आपल्या मुलाला फोनकरून बोलवले होते. तेवढ्यात मागून कुणीतरी विचारले "उधर गाडी किसने खड़ी की है ?" कुठल्यातरी अपार्टमेंटचा वाॅचमॅन आला होता. 
"मेरी गाड़ी है, मेरा कार्ड खो गया है" काका समजूत घालत म्हणाले.
"लेकिन उधर no parking है, हमारे अपार्टमेंट के लोगों गाड़ी निकलने को प्रॉब्लम हो रही है" वाॅचमॅन तक्रारीच्या स्वरात म्हणाला. 
यावर काकांचे उत्तर ऐकुन आम्ही कार्ड शोधणं थांबवलं आणि आपापल्या घरी निघालो. काका त्या वाॅचमॅनला पटवून देत म्हणत होते 
"उन लोगों को गाडी को साइड से निकालने को बोल ना" "


"वा म्हणजे काकांना थोडा त्रास झाला आणि सगळे नियम खड्यात"  लोखंडे म्हणाले.

"अहो सगळी कडे असंच असतं. जर आपला फायदा असला किंवा विशेष त्रास नसला तर आपण नियम पाळत असतो" गोखल्यांच्या मुद्द्याचा पुरावा मिळाल्याने ते उत्साहाने म्हणाले.

"पण सगळे असेच नसतात, काही लोकं खरे नियमाचे पक्के असतात" गुप्ते पॉईंट सोडायला तय्यार नव्हते.

" character is the thing which one does when no one is looking. पुष्कळ लोकं फक्त लोकांना दाखवण्या साठी स्वतः ची एक इमेज बनवण्या साठी प्रामाणिकपणाचं सोंग करतात. " - गोखले.

"अहो परवा पोस्टात अशीच घटना झाली" लोखंडे अपनी हकीकत सांगायला लागले.

"एका  शनिवारी मी पोष्टात NSC संबंधित कामा साठी गेलो होतो. पोष्टात जाताच पुलंचा "माझे पौष्टिक जीवन" हा लेख आठवला. पोस्ट ऑफिस मधलं  वैभव आता उरलं नाही. कामासाठी तेथे आता कोणी गर्दी  करत नाही. खाजगी पत्र तर कालबाह्य झाली आहेत. आपल्या शाळेत सुट्टीच्या दिवशी गेल्यावर जस उदास आणि सुनं वाटतं तसंच काही पोष्टात वाटत होतं. २ कॉउंटर्स, पहिल्यावर लोक registered पोस्ट करायला आलेली आणि दुसऱ्यावर PPF , NSC  सारखी इतर आर्थिक कामं. रांकेत २-३ लोक. आणि माझा पुढे खरंच सांगतो पहिल्या गोष्टी सारखेच (तेच नव्हे) एक काका. पोस्ट मास्टर साहेब वयस्क होते, आणि तसे विनम्र आणि हसरे होते. काकांचा आणि मास्तरांची वादावादी चालली होती. काकांची NSC mature  झाली होती पण त्यांने ती वेगळ्या हापिसातून घेतली होती. आणि ह्या शाखेत त्याचा चेक मिळवायला अँप्लिकेशन, ऍड्रेस प्रूफ, आयडेंटिटी कार्ड असल्या पुष्कळ भानगडी काकांना करायला लागल्या होता. ते ३-४ आठवड्या पासून चकरा टाकत होते पण दुसरा हापिसातून approval आलेल नव्हता. 

"मैने  कल  चेक किया था उस  ऑफिस से कोई चेक नाही आया  है, हां अभी एक बंडल आया है पर सॉर्ट नही  हुआ है, पता नहीं उसमे आपका लेटर है या नहीं। थोडी देर रुकना पडेगा आप दोपहर को आईये" मास्टर समजावत होते. 

"अरे साहेब अब मैं  दोपहर को फिर कैसे आऊंगा, लडके को शनिवार को ही वक्त होता है, वो ३-४ हफ्ते से हर शनिवार मुझे सुबह यहाँ छोड़ता  है, और दोपहर को  मेरा काम होगा या नहीं पक्का नहीं है. आप उस ऑफिस फ़ोन करके पूछ लीजिये ना की मेरा लेटर भेजा  है या नहीं" 

"मैंने आज सुबह ही फ़ोन किया था, वहां का आदमी आज छुट्टी पर है"

"ऐसे कैसे वो छुट्टी पर है पर है, मेरा पैसा लेने के लिए मुझे कितना परेशान कर रहे हैं. हमारे पैसे से ही आपको तनख्वाह मिलती  है" काकांनी एकदम सूर बदलला

"चुप कर के ज्यादा नहीं बोलना" मास्टर बंगलोरी हिंदीत चिडून बोलले. "चुप करके" चा अर्थ बंगलोरी हिंदीत "उगीच" असा असतो. 

"क्यों नही बोलेंगे, आप सब जनता के नौकर हैं, वो आदमी जो छुट्टी पर  है वो भी हमारा नौकर है, आपको हमारा काम अभी करना  पडेगा. 

मास्तरांचा चेहरा रागानी लाल झाला होता, हाथ कापत होते. हे बघून एक कर्मचारी त्यांच्या जवळ आला आणि त्यांना चहा देत देत म्हणाला "आरामागीइरु. चहा कुडी.  मनसक्के तोगोबेडा " (शांत व्हा आणि चहा घ्या. मनाला लावून  घेऊ नका).  मग तो काकांना बघून म्हणाला "मै  देखता आपका काम". 
काकांनी पहिली फेरी जिंकली होती. 
मास्टर मागे खुर्ची वर बसून चेहरा पाडून चहा पीत होते. नंतर इतर स्टाफ कडून कळलं की ते पुढच्या महिन्यात retire  होणार आहेत, आणि त्यांचा कर्तृत्वा मुले त्यांना पोष्टात पुष्कळ मान आहे. 
दुसऱ्या माणसांनी बंडल उघडल आणि सर्वात वरतीच काकांचं पत्र होतं. 

काकांनी दुसरी फेरी सुद्धा जिंकली होती. 

त्यांना आता आपण मास्तरांना उगीच बोललो अस वाटायला लागले होते. मास्तर पण रिटायरमेंट ला आले आहेत ये ऐकून काकांच्या मनात त्यांच्यासाठी सहानुभूती निर्माण झाली होती.  मास्तर चहा संपवून माझं काम बघत होते.  त्यांनी मास्तरांशी थोड गोड बोलायचा प्रयत्न केला. 
"सर १ महिने से हर हफ्ते आ रहा हूं, लडका सुबह छोड के जाता है वापस बस से जाना पडता  है. रिटायर्ड हूँ  पैसे लडके से मांगने पड रहे हैं, बहुत प्रॉब्लेम है"
"कोई बात नहीं.  हमारे हाथ में भी तो कुछ नहीं था ना , उस ऑफिस से लेटर नहीं आता तो हम कुछ नहीं कर सकते थें"- मास्तर 
"ठीक है सर कोई बात नहीं" - काका आता एकदम खुशीत आले होते. 
काकांचा चेक तयार झाला, सही साठी तो मास्तरांकडे आणला गेला. मास्तरांनी काकांना चेक दाखवला आणि सही करणार तेवढ्यात काका म्हणाले. 
"अरे इस चेक पर तो  मेरा पूरा नाम है, मिडिलनेम "कुमार" सहित, क्या आप चेक सिर्फ मेरे  नाम और सरनेम पर लिख सकते हैं, मेरा बैंक अकाउंट इसी नाम से से है"
"आपके NSC  पर जो नाम है वही नाम हम लिख सकते हैं, हम तो नौकर हैं जो नियम है हमें उससे  ही जाना पड़ता है" आता संधी मास्तरांची होती. 
"अरे साहब देख लीजिये ना थोड़ा और टाइम लगे तो भी कोई बात नहीं, ये इनकम टैक्स के चक्कर में कौन पड़ेगा, कोई थोड़ी बहुत सेवा करनी हो तो  भी चलेगा" काका एकदम नियमावरून घसरत म्हणाले. 
माझं काम पण झालं होता म्हणून मी पण आपल्या घरी जायला निघालो"

"मग काय निष्कर्ष आजच्या सभेचा?" गोखलयांनी विचारले.

"अहो कसला निष्कर्ष, आपल्या लोकांना स्वराज्य आल्यानंतर सर्व सोयी हव्या पण नियम पाळायला नको" गुप्ते म्हणाले.

"नाही हे सर्वांशी सत्य नाही. लोकांना सर्व हक्क हवे आणि नियम पाळण्याचा अभिमान हि हवा फक्त त्या नियमांनी त्यांना त्रास होता काम नये"

"हे बरोबर " सर्वांची मतं शेवटी जुळली.









Thursday, April 6, 2017

चित्रहार (मराठी)

१९८५-१९८६ च्या दरम्यान टीव्ही नावाच्या जादूगाराने सगळ्या भारताला सम्मोहित केले होते. त्याआधी दैनंदिन मनोरंजन म्हणजे फक्त रेडिओ किंवा वाचन होते. नाटक आणि सिनेमा महिन्या दोन महिन्यातून एकदा बघितला जायचा. लोकं संध्याकाळी एकमेकांच्या घरी सहज भेटायला जात असत. सध्या ही पद्धत लोप पावली आहे. मनोरंजनाच्या व्यतिरिक्त टीव्ही ने पुष्कळ सामाजिक बदल ही घडवले. लोक टीव्ही  बघण्यासाठी एकमेकांच्या घरात जमायची. पूर्ण आळीत, चाळीत, वाड्यात, किंवा गल्लीत एक टीव्ही पुरायचा. एका खोलीत १० बायकांना अर्धा तास गप्प बसवणं (चित्रहार पाहत) हे फक्त टीव्हीलाच जमलं. आमची गोष्टं  त्याच काळातली आहे.
 आमच्या रेल्वे कॉलोनीत पहिला टीव्ही आला स्टेशन मास्टर (SM) साहेबांच्या घरी EC  कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट. तसे इंजिनियर आणखीन अन्य बडे अधिकार्यांकडे सुद्धा टीव्ही होते पण रेल्वे कॉलोनीतला सार्वजनिक टीव्ही स्टेशन मास्तरांचा  होता. याच टीव्ही वर कपिल देव ने १९८३ चा क्रिकेट वर्ल्ड-कप जिंकला होता. मास्तरांकडे  सर्वांना टीव्ही  बघायला जायची मोकळीक होती. रविवारी तर सकाळ पासून सगळी मुलं त्यांच्या घरी जमायची. त्यांची फक्त ही अपेक्षा असायची कि रात्री ८:३० नंतर लोकांनी आपापल्या घरी जावे. लोकं सुद्धा त्याला मान देऊन ८:३० नंतर तेथे थांबत नसत. चित्रहार, छायागीत, रविवारचा सिनेमा या कार्यक्रमांना सगळे त्यांच्याकडेच असायचे. स्टेशन मास्तरांच्या पत्नींना गर्दीमुळे थोडा त्रास होत असे पण त्याचे पुष्कळ फायदे हि असल्याने त्या तक्रार करत नसत. घरी टीव्ही बघायला आलेली मुलं त्यांच्या घरची कामं ख़ुशीने करून देत असत. टीव्ही बघायला सगळ्या बायका त्यांच्या घरी जमायच्या म्हणून कॉलोनीतल्या सगळ्या घडामोडी त्यांना घरी बसल्या कळू लागल्या आणि महिला मंडळात त्यांचा रुबाब वाढला.
 पण वाईट असो कि चांगला, काळ बदलतोच. काही दिवसांनी ASM (असिस्टंट स्टेशन मास्तर) कडे हि तोच EC  कंपनीचा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला आणि सगळी गर्दी आता ASM  कडे वळायला लागली. ASM  ने ८:३० चे  बंधन ठेवले  नव्हते.  श्री आणि श्रीमती SM ला गर्दी कमी झाल्याने बरे वाटले होले. आता ते घरी लोळून, गाणी म्हणत कसे हि TV  बघायला मोकळे होते. पण ASM  च्या घरी जमलेल्या गर्दीमुळे SM साहेबांना थोडा मत्सर वाटू लागला. श्रीमती SM ची महिला मंडळाच्या मानाची जागा श्रीमती ASM नि पटकावला मुळे त्या हि चिडचिड करायला लागल्या होता.
"मेला टीव्ही घरात आल्यामुळे एवढं मिरवायला नको. आणखीन सगळ्या जमतात छायागीत कि चित्रहार बघायला. गाणी कसली ऐकतायेत, चकाट्या पिटायला अड्डा जमतो सगळा. "
 SM साहेब चतुर होते, त्यांना आपल्या कडे गर्दी नको होती पण ASM चे महत्व हि कमी करायचे होते म्हणून त्यांनी एक युक्ती काढली. एक दिवशी ते कॅन्टीन मध्ये मिठाईचा पुडा घेऊन आले आणि घोषणा केली
  "मी नवीन रंगीत TV  घेतला आहे, गणोबा सगळ्यांना पेढे दे".
 आणि आता कोणा कडे टीव्ही बघायला जायचे हा प्रश्न लोकांना पडायच्या आधीच त्यांनी आणखीन एक घोषणा केली.
"माझा जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही  उद्या पासून कॅन्टीन मध्ये ठेवला जाईल म्हणजे कोणाला टीव्ही बघायला कोणाच्या घरी जायची गरज पडणार नाही."

SM साहेबांनी एका दगडात तीन पक्षी मारले. पहिला, माझ्या सारखा टीव्ही कॉलोनीत कोणा कडे नाही. दुसरा,  ASM कडे गर्दी करायची आता गरज नाही; आणि तिसरा म्हणजे ASM  सारखा टीव्ही  तर मी दान सुद्धा करू शकतो.
 ASM आणि अरसिक लोकांनी टीव्ही  कॅन्टीन मधे ठेवायचा विरोध केला. त्यांच्या मते या मुळे लोकांचं लक्षं  कामात लागणार नाही. कॅन्टीन मध्ये विक्री नीट होणार नाही, प्रवाशांना त्रास होईल. पण इतर सर्व टीव्ही  ठेवायच्या पक्षात असल्याने असे ठरले कि २ आठवडे टीव्ही कॅन्टीन मध्ये ठेवला जाईल. जर कॅन्टीन मध्ये गोंधळ झाला, यात्रींची तक्रार आली किंवा याने कॅन्टीनची विक्री कमी झाली तर टीव्ही कॅन्टीन मधून काढून घेण्यात येईल.
 पण झाले याचा विपरीत, लोकं आपली कामे पटकन उरकून टीव्ही बघायला यायला लागली. प्रवासी मंडळी  टीव्ही  बघायला कॅन्टीन मध्ये यायची आणि काही तरी खायला हि मागायची म्हणून कॅन्टीनची विक्री वाढली. गाडीची वाट पाहताना टीव्ही बघायची करमणूक झाली म्हणून कोणीही तक्रार केली नाही.
 कॅन्टीन मध्ये टीव्ही आला आणि सगळं काही बदलले. पूर्वी ओसाड पडलेले कॅन्टीन आता नेहमी लोकांनी गजबजलेले राहू लागले. प्लॅटफॉर्म रेल्वे कॉलोनीला लागून असल्याने ऑफ-ड्युटी पुरुष आणि मुलं तेथे यायची. बायका मात्र परत श्रीमती SM कडे रंगीत टीव्ही बघायला जमायच्या. गावाकडे शेत असलेले हमाल, गॅंगमन आणि इतर मंडळी "आमची माती आमची माणसे" बघायला यायची. तिकीट कलेक्टर जोशींचे वडील रिटायर्ड प्रोफेसर होते ते दुपारी UGC चे शैक्षणिक कार्यक्रम बघायला यायचे. पार्सल क्लार्क सुब्रमण्यम रात्री लुंगी नेसून १० वाजताच्या इंग्रज़ी बातम्या ऐकायला यायचे.
 खरी गर्दी असायची चित्रहार आणि छायागीतच्या वेळेस बुधवारी आणि शुक्रवारी. त्या वेळेस कुठल्याही गाडीची वेळ नसायची आणि सगळं स्टाफ हळू हळू तिथे गोळा व्हायचा.
 पण खरी मजा झाली ती त्या बुधवारी. दयाशंकर आणि हजारी प्रसाद हे दोघं हमाल हिंदी सिनेमांचे दर्दी होते. दयाशंकर इलाहाबादचा असल्याने अमिताभ बच्चनचा फॅन होता. दर बुधवारी प्रत्येक गाण्यापूर्वी दयाशंकर म्हणायचा "अगला गाना बच्चन का आएगा". पुढे पुढे सर्वांना या गोष्टीचा त्रास व्हायला लागला. हजारी प्रसाद हमाल जो दयाचा मित्र होता त्याने दयाची मजा करायचे ठरवले.
पुढच्या बुधवारी पहिल्या गाण्यापूर्वी दया परत  म्हणाला "अगला गाना बच्चन का आएगा".
हे ऐकताच हजारी म्हणाला  "दया बहुत सुन लिया तेरा। अब अगर पहला गाना अमिताभ का नहीं आया तो तू मुझे चाय पिलायेगा"
"हां पक्का!!" दया उत्साहाच्या भरात म्हणाला.  
पण पाहिलं गाणं  "तू गंगा की मौज़ मैं जमुना का धारा" होतं  आणि हजारी पैज जिंकला.

दुसऱ्या गाण्या पूर्वी दया परत ओरडला  "अगला गाना पक्का अमिताभ का आएगा".
हज़ारी त्याला खिजवत म्हणाला  "नहीं आया तो मुझे सुबह का नाश्ता करवाना पड़ेगा"
'चल  ठीक है" दया म्हणाला. 
पुढचं गाणं  "ज़िन्दगी एक सफर है सुहाना" होता. दया परत हरला .

आता दयाला कळले कि हजारी त्याचा फायदा घेत आहे. मग तो हजारीला म्हणाला 
  "हज़ारी अब तू बता अगला गाना कौनसा होगा। "

" मेरे को नहीं मालूम" मिस्कीलपणे हसत हज़ारी म्हणाला. 

"ऐसे नहीं चलेगा, तेरे को भी अंदाज़ा लगाना पड़ेगा वरना चाय नाश्ता भूल जा। "

"नहीं ऐसे नहीं!! शर्त तो ऐसी नहीं लगी थी दया, हमने तुझे कहाँ बोला था की तू अगला गाना किसका आएगा ये बता। "
लोकांना हा आरडा ओरडा आवडला नाही आणि सगळ्यांनी त्या दोघांना शांत बसायची किंवा बाहेर जाऊन भांडायची ताकीद दिली. 
आणि पुढचं गाणं अमिताभच आलं  "रोते हुए जाते हैं सब। "

"मैं जीत गया" दया ओरडायला लागला. 

हज़ारी म्हणाला "नहीं ऐसा थोड़े ही होता है तूने इस बार कहा बोला था कि अगला गाना अमिताभ का होगा। "

त्या दोघांची बाचाबाची सुरु झाली आणि लोकांनी त्यांना कॅन्टीनच्या बाहेर काढलं.

दुसऱ्यादिवशी सकाळी दया आणि हजारी माझ्या कडे आले आणि मला त्यांच्या भांडणाचा निकाल लावायला सांगितले. मी हजारीला समजावले कि दया हरला आहे हे खरं असलं तरी शर्यत दोन्ही कडून लागली पाहिजे. यावर हजारी म्हणाला कि पुढच्या बुधवारी चित्रहार मध्ये १ गाणं तरी राजेश खन्नाचं असेल आणि नसलं तर मी दयाला २ रुपये देईन.  हजारी राजेश खन्नाचा फॅन आहे हे तेंव्हा मला कळले.
दयाने अमिताभचं  गाणं न आल्यास हजारीस २ रुपये देणं कबूल केलं. पण हजारीला दयावर विश्वास नव्हता.  शेवटी हे ठरले कि दोघांनी माझ्याकडे २-२ रुपये द्यायचे आणि जो जिंकेल त्याला मी पैसे देणार.
पुढच्या बुधवारी "मेरे सपनो की रानी " गाणं आलं आणि मी हजारीला ४ रुपये दिले. तिथे हजर असलेल्या सगळ्या स्टाफ ने या बद्दल चौकशी केली आणि पुढे यावर पुष्कळ गप्पा झाल्या. 
 पुढच्या बुधवारी चित्रहार सुरु होण्या आधी  माझ्या कडे १० हिरोंची नाव आणि २० रुपये होते. ६ लोकांचा अंदाज बरोबर ठरला आणि मला १२ रुपये द्यावे लागले, ८ रुपये माझ्या खिशात गेले. 
२-३ आठवडे अशेच गेले आणि मग मला समझले कि माझ्या नकळत मी या रेल्वे प्लॅटफॉर्मवर चित्रहारच्या गाण्यांचा सट्टा चालवायला लागलो होतो. 
 कॅन्टीनच्या काउंटर वर १ कार्डबोर्ड चा विटे एवढा बॉक्स ठेवला गेला. त्यावर पैसे आणि चिट्ठ्या टाकायला १ भेग पाडली होती. लोकं एका कागदावर हिरो किंवा हिरोईन चे नाव लिहून त्या कागदामध्ये काही पैसे ठेऊन बॉक्स मध्ये टाकायची. बुधवारी चित्रहार मध्ये ज्याचे गाणे आले त्याला दुप्पट पैसे. सुरुवातीला करमणूकीसाठी सुरु झालेल्या या खेळाचा नंतर लोकं पैसे मिळवायचं साधन म्हणून उपयोग करायला लागले . कधी कधी लोकं १०-२० रुपये सुद्धा लावायची. मला हि या खेळ मुळे दर बुधवारी १० ते २० रुपये मिळायला लागले. 
नंतर लोक नट नटीच्या जोडीला गायक गायिकांची नावें हि टाकायला लागले. महंमद रफी आणि लता मंगेशकर यांची गाणी प्रत्येक चित्रहारात हटकून यायची, एका बुधवारी मला पुष्कळ पैसे द्यावे लागले आणि म्हणून मी या खेळात फक्त नट नटींची नावे स्वीकार करायला लागलो. 
  आता चित्रहारला गर्दी वेगळीच असायची. लोकं आपल्या चिट्टीतल्या नटाच्या गाणं यायची वाट बघायची  आणि गाणं आला कि आरडा ओरड आणि हंगामा  करायला लागायची. मला सिनेमाची खूप माहिती नसल्याने कधी कधी वादावादी हि व्हायची. 
 एका माणसाने धर्मेंद्र च्या नावाची चिट्ठी टाकली आणि "तुम पुकार लो" या गाण्यानंतर माझ्या कडे पैसे मागायला लागला. मला धर्मेंद्र कुठे हि दिसला नव्हता पण त्याच्या मते धर्मेंद्रला या गाण्यात पाठमोरा दाखवले होते.  
दर बुधवारी असले हंगामे आणि चकमकी होत असल्याने जी मंडळी खरंच गाण्यांचा आस्वाद घ्यायला जमायची त्यांना त्रास होऊ लागला. त्यांनी या सट्ट्याबद्दल स्टेशन मास्तरांकडे तक्रार केली. स्टेशन मास्तर माझ्या परिचयाचे होते. त्यांनी मला हा सगळा प्रकार बंद करायची ताकीद दिली आणि मी हि ते मान्य केलं. 
  पण या खेळाने मला पैसे मिळू लागले होते म्हणून मी गुपचूप या खेळ सुरूच ठेवला. या खेळात भाग घेण्यारांना ताकीद दिली कि कुणी हि चित्रहारच्या वेळेस एक शब्द सुद्धा काढायचा नाही. दर गुरुवारी सकाळी पैशाच्या हिशोब केला जाईल. आणि कोणी किती पैसे लावले आणि कोण जिंकलं या वर कुठे हि चर्चा करायची नाही. 
 खेळ सुरुच राहिला. मला कधी कधी १०० रुपये सुद्धा मिळायचे. सगळ्या स्टेशनला आता बुधवारच्या चित्रहारचे वेध लागलेले असायचे.  मी आता शुक्रवारच्या मराठी छायागीत करता एक वेगळा बॉक्स ठेवायच्या विचारात होतो पण एका बुधवारी परत मजा झाली.
 रामचंद्र गॅंगमन पहिल्यांदा या खेळात शामिल झाला आणि त्याने एकट्याने १०-१० रुपयाच्या ५ चिट्ठ्या टाकल्या. प्रत्येक चिट्ठी वर नावाबरोबर एक संख्या हि लिहिली होती.

१. प्रदीप कुमार 
२. विश्वजीत 
३. नादिरा 
४. सुनील दत्त 
५. वहीदा रहमान

आणि त्या बुधवारी ही गाणी या क्रमाने आली. 

१. जो वादा किया वो निभाना पड़ेगा।
२. पुकारता चला हूँ मैं।
३. आगे भी जाने ना तू.
४. ना मुह छुपा के जियों
५. पिया तोसे नैना लागे रे.


रामचंद्रांची सगळीच नावेच त्याच क्रमाने आली होती. त्या बुधवारी पहिल्यांदा मला या खेळात नुकसान झाले तेही ५० रुपयाचे. मी रामचंद्राला याच गुपित विचारले पण तो माझ्या कडे बघून हसला आणि निघून गेला. 
पुढच्या बुधवारी रामचंद्रने २०-२० रुपयाच्या ६ चिठ्ठया टाकल्या आणि परत सगळी गाणी त्याने सांगितलेल्या क्रमाने आली आणि मला १०० रुपयाचा फटका बसला. रामचंद्राला कुठली गाणी येणार आहे ये तर माहिती होतच, शिवाय ती कुठल्या क्रमाने येणार आहे आणि गाणी ५ येणार आहेत कि ६ ये सुद्धा बिनचूक माहित होता. मला काही समजे ना. 
 रामचंद्र काही केल्या आपला गुपित सांगत नव्हता आणि मला १५० रुपये गमावल्या नंतर हा खेळ सुरु ठेवायची हिम्मत नव्हती. मी रविवारी रामचंद्राला घरी बोलावून जेवायला बोलावलं आणि चांगली दारू पाजली. तो तरी काही सांगायला तय्यार नव्हता. शेवटी त्याला खेळ बंद झाल्याचे कळले तेंव्हा त्याने 'अंदर की बात' सांगितली. त्याचा खुलासा ऐकून मी तीन ताड उडालो. त्याला दर बुधवारी सकाळी स्टेशन मास्तर या चिट्ठ्या आणि पैसे देत होते आणि गुरुवारी रामचंद्र जिंकलेले पैसे परत मास्तरांना द्यायचा. त्याला या कामासाठी १० रुपय मिळत होते. 
 सोमवारी मी कॅन्टीनच्या काउंटरवरचा बॉक्स काढून टाकला आणि एक बोर्ड ठेवला ज्यावर "आज पासून सर्व बंद" एवढंच लिहिलं. स्टेशन मास्तर दुपारी जेवायला कॅन्टीन मध्ये आले पण मी त्यांची नजर चुकवत आपले काम करत राहिलो. 
 जेवण नंतर जेव्हां ते आपला खोलीत एकटे होते मी भीत भीत त्यांना भेटायला गेलो. 

" काय गणोबा, कसं काय चाललं आहे? "

"साहेब आपल्याला सगळं माहितंच  आहे" मी खाली मन घालूनच बोललो. 

"तर रामचंद्राने सगळं सांगितलं तुम्हाला" साहेब हसत म्हणाले. 

"आता काय बोलू साहेब, आज पासून सगळं बंद" 

"असं तुम्ही आधीही बोलला होता" मास्तर मिस्कीलपणाने म्हणाले. 

"साहेब हा तर फक्त खेळ होता. तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगतो. आपल्या या खेड्यात करमणुकीचे काय साधन आहे. थोडा फार विरंगुळा तर हवा ना. तुम्ही स्वतःच सांगा कि सगळा  स्टाफ पूर्वीपेक्षा तरतरीत आणि उत्साही असतो कि नाही. या स्टेशनवरचा स्टाफ वर्षानुवर्षे तेच काम करतो आहे, त्याला काही चैतन्य काही नावीन्य नको का? माणसाला जगायला काही स्वप्न, काही संघर्ष नको का, तेच तेच काम करून सगळे विटून गेले होते, या खेळाने सगळ्यांची थोडी करमणूक झाली तर काय बिघडलं ?" 

"गणोबा वक्तृत्व स्पर्धेत करतात तसली भाषणं केली तरी खोट्याचं खरं करू शकणार नाही. आता मला सांगा जर हा खेळ होता तर मग आज "आज पासून सगळं बंद" अशी पाटी का लावली आहे ? तुम्ही हरला म्हणूनच ना? जेव्हां तुम्ही हरला तेंव्हा तुम्हाला हा खेळ नकोसा झाला. कधी विचार केला आहे कि जेव्हां तुम्ही जिंकला तेव्हां लोकांनी किती पैसे हरले असतील? बिचारी लोकं घाम गाळून पैसे मिळवतात ते काय सट्ट्यात गमावण्यासाठी?  कॅन्टीन मध्ये TV करमणूकी साठी ठेवला होता सट्ट्यासाठी नाही. 
 आणि स्वप्नं आणि संघर्षाचं म्हणाल तर लोकांकडे चांगले आणि सकारात्मक पर्याय असतात पण ते कठीण असतात. लोकांना स्वप्न हवी, संघर्ष हवे पण फक्त सोपी, ज्यासाठी परिश्रम लागत नाही ती. तुमच्या प्रमाणे या खेड्यात करमणुकीचे साधन नाही, तुम्ही ही समस्या का सोडवत नाही? आपला कॉलोनीत एक रिकामं पडलेलं मैदान आहे, तिथे खेळाची सोय करणं हे स्वप्नं नाही होऊ शकत आणि त्यासाठी संघर्ष नाही केला जाऊ शकत? मी सांगतो तुम्ही जे चालवलं होतं ते स्वप्नं नव्हें व्यसन होतं. प्रत्येक व्यसनामागे ध्येय नाही, संघर्ष चैतन्य नाही असल्याचं  काही तरी सबबी सांगितल्या जातात  मग ते व्यसन जुगार असो, दारू असो कि सिगारेट. हे उसने चैतन्य, संघर्ष सोपे असतात कारण ये थोडे से पैसे खर्च करून विकत घेता येतात आणि नंतर ये व्यसनच त्यांच्या आयुष्याचं संघर्ष होऊन जातं." 

"साहेब चूक झाली, खरंच आज पासून सगळं बंद" 

"ठीक आहे, मग जा आता, झालं ते विसरून जा" 

"पण साहेब..." 

"गणोबा तुम्हाला तुमचे हरलेले पैसे नाही मिळायचे " साहेब हसत हसत म्हणाले. 

"नाही साहेब पैसे नको, मला अजून हा उलगडा झाला नाही कि तुम्ही गाणी कशी ओळखली" खरं तर मला पैसेच हवे होते पण मी लगेच पवित्रा बदलला. 

"ते तर सोपं आहे, माझा भाचा दिल्ली दूरदर्शनला कामाला आहे आणि टेलीफोन बद्दल तुम्हाला माहीतच असेल " 
"बरं साहेब मी जातो" 

" गणोबा थांबा, ये घ्या १५० रुपये जे मी २ दिवसात जिंकले आहेत. आपल्या कॉलोनीतलं मैदान स्वच्छ करवून घ्या. १ फ़ुटबाँल आणि व्हॉलीबॉल हि विकत घ्या आणि एक स्पोर्ट्स क्लब सुरु करा. तुमच्या त्या खेळाच्या सगळ्या लोकांना या क्लबात शामिल करा म्हणजे त्यांची सगळी प्रतिस्पर्धी, संघर्ष आणि घ्येय बाहेर येईल. आणि हां मी पण तुमच्या खेळात होतो नाही का, मी सुद्धा येत जाईन रोज संध्याकाळी. TV पण व्यसनच आहे रात्री थोड्या वेळच पुरे, जास्त नको"